पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 15 फेब्रुवारीपासून राज्यातून थंडी गायब होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यभरात गारठा कमी होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, कमाल तापमानाचा पारा देखील सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचे चटके अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम
राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. नाशिक येथील निफाडमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. निफाड येथे 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.काल बुधवारी औरंगाबाद, धुळे आणि जळगाव येथे पारा 10 अंशांच्या खाली होता. आज मात्र, या तिन्ही जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ झाली आहे. औरंगाबाद आणि धुळे येथे पारा 11 अंशांवर तर जळगाव येथे तापमानाचा पारा 10.5 अंशांवर गेला आहे. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 11 ते 19 अंशांच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
दरम्यान, हवामान बदलामुळे राज्यात किमान आणि कमाल तापमानात तफावत आढळून येत आहे. कमाल आणि किमान तापमानात 14 ते 25 अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा तर दुपारी उन्हाच्या झळा बसत आहेत.राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद बुधवारी सोलापूर येथे 35.3 अंश सेल्सिअस झाली. अकोला, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान 34 अंशांवर होते. याचबरोबर पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्हयांचे कमाल तापमान 31 वरून एकदम 35 ते 36 अंशांवर जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
प्रमुख शहरांतील कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे 33.1 (12.4), औरंगाबाद 32.2 (11), जळगाव 33.5 (10.5), धुळे 31 (11), कोल्हापूर 33.3(19.1), महाबळेश्वर 29.3 (15.8), नाशिक 32.3 (12), सातारा 33.6 (14.9), सोलापूर 35.3 (18.1), नांदेड 33.4 (16.2), परभणी 33.3(14.6), अकोला 34.4 (14.1), अमरावती 34(12.7), बुलडाणा 31(15.4), ब्रह्मपुरी 33.9 (16.8) बीड (२८)