बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीरोजी संपुष्टात आला आहे.यावर मातोश्री येथे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे भूमिका मांडत आहेत.
गद्दारांचा दावा विकृतपणाचा
उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसऱ्या शिवसेनेला मानत नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. यासंदर्भात लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. त्यामुळे आता घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना कुणाची? यावर दिल्लीतील दोन दरबारात सध्या सुनावणी सुरू आहे. दिल्लीत तसे अनेक दरबार आहे. मात्र, शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोग या दोन दरबारांत सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे. तर, निवडणूक आयोगापुढील सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे.