Advertisement

नोकरीसाठी आलेल्या मुलींवर लाठीचार्ज

प्रजापत्र | Saturday, 04/02/2023
बातमी शेअर करा

मुंबईतील दहिसर परिसरात अग्निशमन दलाच्या भरतीवेळी मोठा गोंधळ उडाला. यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या अनेक महिला उमेदवारांनी मैदान परिसरातच आंदोलन सुरू केले. त्याच मुलींवर लाठीमार करण्यात आला आहे.

 

गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू असून राज्यभरातून महिला उमेदवार भरतीसाठी आल्या. मात्र, भरतीमध्ये अपात्र ठरवलेल्या महिला उमेदवार संतापल्याने वातावरण शांत करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंबईतील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर अग्निशमन दलाच्या भरतीसाठी महाराष्ट्रभरातून महिला उमेदवार आल्या. यावेळी भरतीसाठी 162 सेट सेंटिमीटर उंचीची अट ठेवण्यात आली. मात्र, त्यापेक्षा उंची कमी असल्याचे सांगत अनेक मुलींना अपात्र ठरवण्यात आले. महिला उमेदवारांनी हा दावा फेटाळून लावला. तसेच उंची भरत असतानाही अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप केला. यानंतर संतप्त मुलींनी मैदान परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

उमेदवारांच्या समर्थनात ठाकरे गट

अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही आम्हाला डावलण्यात आले असे या तरुणींनी सांगितले. या महिला उमेदवारांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

पोलिसांकडून भरती प्रक्रिया करण्याची मागणी

भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणींनी या भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही तरुणींनी केला आहे. गेली 2 दिवस आम्ही इथे आलो आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत, आम्हाला उंची असून डावलण्यात येत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तर हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करावे अशी पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली आहे.

 

 

Advertisement

Advertisement