पद्मभूषण पुरस्कार विजेत्या गायिका वाणी जयराम यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांच्या जाण्याने संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी वाणी या मृतावस्थेत आढळून आल्याचे थाउझंड लाइट्स पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वाणी जयराम यांचे निधन नक्की कशामुळे झाले याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी जयराम यांनी विविध उद्योगांमधील काही मोठ्या संगीतकारांसोबत सदाबहार गाणी गायली आहेत.
वाणी जयराम यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यांनी देशात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर कामगिरी केली आहे. त्यांनी एक व्यावसायिक गायिका म्हणून ५० वर्षे पूर्ण केली होती. त्यांनी आजपर्यंत १० हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.