मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. आगामी अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तेट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.
मुंबई महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार ४ फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपये इतके होते. २०२३-२४ आकारमान ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपयांवर पोहोचले आहे. नवीन करवाढीची कोणतीही घोषणा नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.