Advertisement

महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत

प्रजापत्र | Tuesday, 31/01/2023
बातमी शेअर करा

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळाले आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे.

शासकीय कार्यक्रमांमध्ये लावले जाणार

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व मोठ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे. .

महाराष्ट्राचे गौरव गीत

महाराष्ट्र गौरव गीत अशी 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताची ओळख आहे. विशेषत: सीमा आंदोलनादरम्यान हे गाणे आंदोलकांच्या तोंडी होते. कवी राजा बढे यांनी हे गीत लिहिले आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहिर अमिर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले आहे.

Advertisement

Advertisement