नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. यती एअरलाइन्सचे एक विमान 68 प्रवाशी व 4 क्रू सदस्यांसह राजधानी नेपाळहून पोखराला जात होते. पण पोखरा विमानतळावर उतरताना ते अचानक क्रॅश झाले. ATR-72 प्रकारचे हे विमान कोसळल्यानंतर पेटले. या अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. पण स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आतापर्यंत विमानातून 36 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
या अपघाताचे काही छायाचित्र व व्हिडिओ उजेडात आलेत. त्यात घटनास्थळावरील अत्यंत भयावह चित्र दिसून येत आहे. बचाव व मदत कार्य करणाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीच्या मते, लँडिंगपूर्वी या विमानात आगीचे लोट दिसून आले. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे घडल्याचे म्हणता येत नाही. यापूर्वी या अपघातासाठी खराब हवामानाला जबाबदार धरले जात होते.
अपघाताशी संबंधित अपडेट्स...
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली.
घटनास्थळी लष्कर तैनात करण्यात आले. आता लष्कर स्वतः अपघातस्थळी बचाव मोहीम राबवत आहे.
भारताचे नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नेपाळच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी हा दुर्दैवी अपघात असल्याचे म्हटले आहे.
कुठे झाला अपघात?
हा विमान अपघात कासकी जिल्ह्यातील पोखरातील जुने एअरपोर्ट व पोखरा एअरपोर्ट दरम्यान झाला. विमान एका डोंगराला धडकल्यानंतर दरीत कोसळले. पोखरा विमानतळ राजधानी काठमांडूहून 200 किमी अंतरावर आहे.
केव्हा घडला अपघात?
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने बचाव व मदत कार्य सुरू केले आहे. माध्यमांनी दुपारी 12 च्या सुमारास या अपघाताचे वृत्त दिले.
5 भारतीयांसह 9 परदेशी नागरीक
कमल के सी हे या विमानाचे कॅप्टन होते. विमानातील 68 प्रवाशांत 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरीश, 2 कोरियन, 1 अफगाणी व एका फ्रेन्च व्यक्तीचा समावेश होता. यात 3 नवजात बाळांसह व 3 मुलांचाही समावेश होता. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले की, आतापर्यंत एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आले नाही.
2022 च्या विमान अपघातात 22 जणांचा गेला होता बळी
नेपाळमध्ये गतवर्षी मे महिन्यातही विमान कोसळले होते. त्यात 19 प्रवाशांसह 3 क्रू सदस्यांचा बळी गेला होता. यात 4 भारतीयांचाही समावेश होता. नेपाळ लष्कराच्या शोध व बचाव पथकाला मुस्तांगच्या सॅनोसव्हेयर भागातील डोंगराळ भागात विमानाचे अवशेष आढळले होते. हे विमान 43 वर्षे जुने होते. तारा एअरक्राफ्टच्या या अपघाताच्या चौकशीसाठी नेपाळ सरकारने 5 सदस्यीय आयोग स्थापन केला होता. या आयोगाकडे अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.