अमेरिकेत बुधवारी NOTAM (नोटिस टू एयर मिशन) प्रणालीत बिघाड झाल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार सुमारे 1हजार 110 उड्डाणे उशिराने उड्डाण घेत आहेत. 90 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सिव्हिल एव्हिएशनच्या वेबसाइटवर याची पुष्टी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
फेडरल एव्हिएशन एजन्सीने एक पत्रक जारी केले आहे. NOTAM (नोटिस टू एअर मिशन) यंत्रणा 'फेल' झाली आहे. ते कधी ठीक होईल हे सांगता येत नाही. मात्र, लवकरच ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.
एनबीसी न्यूजनुसार, जवळपास 400 उड्डाणे उशीराने ऑपरेट होत आहेत. यामध्ये देशांतर्गत आणि परदेशातील फ्लाइटचा समावेश आहे. अमेरिकन वेळेनुसार पहाटे 5.31 च्या सुमारास हा तांत्रिक बिघाड उघडकीस आला. मात्र, यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एव्हिएशनच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, तांत्रिक कर्मचारी यंत्रणा दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत.
स्काय न्यूजनुसार, आतापर्यंत एकूण 760 उड्डाणे रद्द किंवा उशीराने ऑपरेट केली जात आहेत. फ्लाइट ट्रॅकर FlightAware.com नुसार, 91 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. FAA ने एका नवीन निवेदनात म्हटले आहे की, संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे हे घडले आहे. फ्लाइट ऑपरेशन्स लवकरच पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
NOTAM म्हणजे काय ?
'नोटीस टू एअर मिशन' हे संपूर्ण फ्लाइट ऑपरेशनचा सर्वात महत्वाचा भाग आहे. यातूनच विमानांना टेकऑफ किंवा लँडिंगची माहिती मिळते. NOTAM रिअल टाइम डेटा विमानतळ ऑपरेशन्स किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC)देते. यानंतर एटीसी ते वैमानिकांपर्यंत पोहोचवते. या प्रणालीद्वारे नैसर्गिक आपत्ती आणि इतर समस्यांवरही लक्ष ठेवले जाते.