Advertisement

आनंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नौकरी भरती मेळाव्याचे आयोजन

प्रजापत्र | Monday, 09/01/2023
बातमी शेअर करा

उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) - सध्या वाढती बेरोजगारी सर्वांच्याच चिंतेत भर टाकणारा विषय बनत चालला आहे. त्यामुळे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचे अर्थात (बाळासाहेब) शिवसेनेचे युवा नेते आनंद सतीशराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७०० सुशिक्षित बेकारांना नोकरी देण्यासाठी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.

 त्यामुळे सुशिक्षित बेकारांच्या जीवनात वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने आनंद बहरणार आहे. विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रातील व्यक्ती युवक व तरुणांचा सतत पक्ष कार्यासाठी वापर करून घेतात. मात्र युवक व तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी अशा पध्दतीचा अनोखा व स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात प्रथमच होत असल्यामुळे तरुणांच्या हाताला कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होण्यास नक्कीच मोलाची मदत होणार आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षाचे नेटाने काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद सतीशराव पाटील यांनी सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांची कामे करण्याचा वसा घेतलेला आहे. त्यांनी युवकाची विशेष फळी जिल्ह्यात निर्माण केली आहे. 

तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त वय वर्षे २१ पूर्ण केलेल्या व ३६ वयोगटातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ७०० सुशिक्षित बेरोजगार युवक- तरुणांच्या हाताला कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उस्मानाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये सुरक्षा जवान, सुपरवायझर, सेक्युरिटी गार्ड, बाउन्सर व बॉडीगार्ड आदी पदांसाठी रोजगार भरती करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ नुसार प्राप्त व भारतातील सर्वात मोठी असलेल्या सिस सेक्युरिटी लिमिटेड कंपनीमध्ये ही मेगा भरती करण्यात येणार आहे.

यासाठी वयाची २१ वर्षे पूर्ण व ३६ वर्षाच्या आतील तसेच इयत्ता १० पास/नापास युवक-तरुण आवश्यक असून त्यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत नोकरी देण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला आदी कागदपत्रांसह उंची १६८ सेंमी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्यांना सुरुवातीस १५ ते २० हजार रुपये पगार, पी.एफ., संपूर्ण परिवारासाठी मेडिकल, ग्रॅज्युटी, बोनस, ग्रुप इन्शुरन्स, जवानांसाठी बॅरेक सुविधा देण्यात येणार आहेत. 

भरती झालेल्या युवकांना दि.१५ जानेवारी रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार असून त्यांना दि.२० जानेवारीपासून पुणे येथे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर त्यांना शासकीय, निमशासकीय, बँका, एटीएम, हॉटेल्स, हॉस्पिटल, प्लॉट, माईन्स, एअरपोर्ट, शैक्षणिक संस्था, पुरातन विभाग आदी ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना ८ ते १२ तास ड्युटी राहणार असून त्यांच्या पगारामध्ये देखील वाढ होणार आहे. 

रोजगार मेळावा बार्शी रोडवरील साईराम नगर येथे दि.११, १२, १३ व १४ असे ४ दिवस सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित केला आहे. यासाठी रणजीत ठोंबरे - ९३०७३३८२९९, सुनील काजळे - ९६२३४७२३७१, लखन गायकवाड - ८२०८७२००९८, योगेश पवार - ७९७२७१२३०९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आनंद पाटील मित्रमंडळाने केले आहे.

Advertisement

Advertisement