मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार असून उद्या पवारांच्या डोळ्यावर मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते परंतु पवारांना सक्तीची विश्रांती दिल्यानं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांवर उद्या रुग्णालयात ऑपरेशन होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
मागील डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार आहेत. पवारांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असून संसर्ग टाळण्यासाठी शरद पवारांना १८ जानेवारीपर्यंत सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार १८ जानेवारीपर्यंत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवारांना लगेच घरी सोडण्यात येईल. त्यानंतर पुढील ८ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुक्कामास असतील. १८ जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर पडू नका असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. त्यामुळे घरातूनच ते पक्षाच्या कार्यक्रमाला अथवा बैठकीला हजर राहतील अशी माहिती NCP नेत्यांकडून देण्यात आली आहे.
पवार रुग्णालयातून थेट पोहचले होते शिर्डीत
नोव्हेंर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं रुग्णालयात उपचार घेत होते. या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरासाठी उपस्थित राहिले होते. रुग्णालयातून शिर्डीला येत आणि पुन्हा शिर्डीतून रुग्णालयात जाऊन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना उत्साह दाखवून दिला होता. पवारांच्या या कार्यक्रमातील सहभागाचे आणि उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. विशेष म्हणजे विरोधकांनाही शरद पवारांमधील या ऊर्जेचं कौतुक वाटलं होतं.