मुंबई - ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द गाजविणारे हे डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे सकाळी मुलुंड येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
गेले दोन तीन महिने ते आजारी होते. दीर्घकाळ पुण्यात वास्तव्याला असणारे डॉ. मेहेंदळे गेले काही दिवस मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मुलुंड येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांचा माध्यमांशी स्नेहाचा धागा जुळला. अमोघ वक्तृत्वासाठी प्रसिध्द असलेल्या डॉ. मेहेंदळे यांनी नाटकातूनही भूमिका केल्या होत्या. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन अशा विविध नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘मला भेटलेली माणसे’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम लोकप्रिय होता.
साहित्यिक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह अशा १८ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकपद त्यांनी भूषविले होते.