ठाण्यामध्ये एक अशी घटना घडलेय. ज्यामुळे सगळेच अचंबित झाले आहे. मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी खचाखच भरलेली ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेची बस(TMT Bus) तब्बल दोन तास थांबवली होती. या घटनेची ठाण्यात जोरदार चर्चा रंगलेय. हा सर्व खटाटोप झाला तो फक्त मांजराच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी. या प्रवाशांना थोडा मनस्ताप झाला तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता.
काय आहे नेमका प्रकार?
बुधवारी सकाळी 11 च्या सुमाराला टीएमटीची बस ब्रम्हांड बस स्टॉपमधून निघत होती. अनेक प्रवासी या बसमध्ये बसले होते. त्याचवेळी बसच्या पुढच्या चाकात मांजराचं एक पिल्लू अडकल्याचं बस ड्रायव्हरच्या निदर्शनास आले. त्यानं ताबडतोब बस थांबवत अडकलेलं पिल्लू काढण्याचा प्रयत्न केला.
पण, तासभर प्रयत्न करुनही ते पिल्लू काही बाहेर निघू शकलं नाही. अखेर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना बोलवावं लागलं. त्यानंतरही तासभर प्रयत्न केल्यानंतर मांजरीचं पिल्लू बाहेर निघालं. त्यामुळे टीएमटीची बस तब्बल दोन तास एकाच जागी अडकून पडली होती.
बस एकाच जागी थांबून राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. तर, किचींत वाहतूक कोंडी देखील झाल्याचे पहायला मिळाले. बस एकाच जागी थांबून राहिल्याने अनेक प्रवाशांनी बस मधून उतरुन दुसरी बस पकडली. बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरने मांजराच्या पिलाला वाचवण्यासाठी धडपड थांबवली नाही. अखेर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी या मांजराच्या पिलाचा जीव वाचवला. ड्रायव्हरच्या या कृतीते सवर्त्र कौतुक होत आहे.