औरंगाबाद-शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे रविवारी दु:खद निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भाई केशवराव धोंडगे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार व खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केले होते. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ नेते ते होते. जनकल्याणासाठी त्यांनी अहोरात्र सेवा केली होती.जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून ते परिचित होते.कंधार तालुक्यातील गऊळ गावात त्यांचा जन्म झाला. पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलने केली. सरकारला प्रश्न विचारले, प्रसंगी जनप्रश्नांसाठी जाबही विचारला होता.
'जय क्रांती’ अशी घोषणा देत विधानसभेत आपल्या ओघवत्या शैलीने भल्याभल्यांना ते गारद करीत होते. केशवराव धोंडगे यांचा शताब्दीनिमित्त विधिमंडळात काही महिन्यांपुर्वी सत्कार करण्यात आला.
अशी होती राजकीय कारकिर्द
केशवराव धोंगडे यांनी खासदारपदी एकवेळ आणि आमदारपदी पाचवेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. निर्भीड आणि स्वाभिमानी प्रामाणिक बाणा ही त्यांची ख्याती होतीच पण तो त्यांनी कधीच सोडला नाही. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधी ते सभागृहात हजर असत. तर विधानसभा संपल्या नंतर सर्वात शेवटी ते तिथून निघत हे त्यांचं वैशिष्ट्य!