जगातील सर्वात प्रसिद्ध लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी कोची येथील लिलावात रेकॉर्डब्रेक बोली लागल्याचं दिसून आलं. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने (PBKS) विकत घेत रेकॉर्ड ब्रेक केला. याशिवाय कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनाही तगडी किंमत मिळाली आहे. आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chri Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते. पण यंदा त्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. निकोलस पूरनलाही 16 कोटींना लखनौ सुपरजायंट्सने विकत घेतलं आहे.
टी20 विश्वचषक 2022 चा 'प्लेअर ऑफ द सीरीज' ठरलेला इंग्लंडचा सॅम करन याच्यावर यंदा अनेक फ्रँचायझीची नजर होती. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या गोलंदाजांना मोठी मागणी असते. यासोबत तो खालच्या ऑर्डरमध्येही चांगली फलंदाजी करू शकतो. हेच कारण होते की बरेच संघ त्याच्यावर बराच पैसा ओतणार. तसंच झालं आणि त्याचा जुना संघ चैन्नई आणि पंजाब यांच्यात त्याला विकत घेण्यासाठी चुरशीची लढाई झाली जी पंजाब किंग्जने जिंकत 18.50 कोटींना सॅमला संघात घेतलं.
स्टोक्स चेन्नईची ताकद वाढवणार
इंग्लंडला टी20 विश्वचषक 2022 ची फायनल जिंकवण्यात मोठा वाटा असणारा बेन स्टोक्स (Ben Stokes) यंदाच्या लिलावात चांगल्या किंमतीला विकला जाणार हे निश्चित होते. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच तो एक चांगला कर्णधारही आहे. अशा स्थितीत एका चांगल्या कर्णधाराची नितांत गरज असलेल्या संघात तो जाईल असे वाटत होते. चेन्नईने भविष्यातील कर्णधार म्हणून स्टोक्समध्ये 16.25 कोटींची गुंतवणूक करत संघात सामिल केले. आयपीएलच्या इतिहासात स्टोक्सला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. स्टोक्सला आयपीएलमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. तो 2017 सालापासून आयपीएलमध्ये खेळतो आहे पण दुखापतीमुळे तो शेवटच्या हंगामात खेळू शकला नाही. स्टोक्स हा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचा गेल्या अनेक हंगामात भाग होता. पण आता तो धोनीच्या चेन्नईची ताकद वाढवणार आहे.
मुंबईच्या संघात दमदार कॅमेरॉन ग्रीन
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडला आहे. ग्रीनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी लढत झाली, ज्यामध्ये मुंबईने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्याला संघात सामील करण्यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले. ग्रीनचे नाव समोर येताच, सर्व संघानी इतक्या वेगाने बोली लावली पाहता पाहत 10 कोटींचा टप्पा ओलांडला. ज्यानंतर अखेर तो 17.50 कोटींना विकला गेला. सॅमनंतर सर्वात महागडा खेळाडू ग्रीन ठरला आहे.
इंग्लंड खेळाडूंवर पैशांचा पाऊस
यंदाचा टी विश्वचषक 2022 इंग्लंडनं जिंकला, त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना चांगली बोली लागणार हे निश्चित होते. त्यामुळे सॅम करन, बेन स्टोक्स यांना मिळालेल्या रेकॉर्डब्रे किंमतीसह युवा खेळाडू हॅरी ब्रुकलाही तब्बल 13.25 कोटींना सनरायझर्स हैदराबाद संघाने विकत घेतलंं. तर आदिल रशीदला देखील हैदराबादने 2 कोटींना विकत घेतलं आहे.