उस्मानाबाद, दि. 21- झारखंड सरकारने जैन धर्मियांचे सिध्दक्षेत्र महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील सकल जैन समजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले. जैन धर्मियांचे 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थकर ज्या पवित्र भूमीत मोक्षाला गेले, अशा झारखंड राज्यातील मधुबन येथील महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामुळे त्या ठिकाणी मांसाहारी हॉटेल, पब, बार व अन्य अशा अनावश्यक व मनोरंजनाच्या नावाखाली अवैध गोष्टी सुरु होणार आहेत. या सर्व बाबी अहिंसा तत्वाच्या एकदम विरुध्द असणार आहेत. जागतिक पातळीवर जैन समाज हा शांतताप्रिय व अहिंसा तत्वाचा पुजारी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन 20 तीर्थंकर पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु, सरकारच्या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पवित्र भूमीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. हा प्रकार जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखा आहे. या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरातील सर्व स्तरातून या निर्णयाचा निषेध केला जात आहे. जिल्ह्यातील सकल जैन समाज, जैन मंदिर ट्रस्ट, संघटना, युवक व महिला मंडळ, शैक्षणिक संस्थांकडून झारखंड सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत असल्याबाबतचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान व झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना उस्मानाबाद सकल जैन समाजाच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते, उपाध्यक्ष अमित गांधी, सचिव अतुल अजमेरा, कुंथलगिरी सिद्ध्क्षेत्र महामंत्री संतोषभाई शहा, आर्यनंंदी ग्रुपचे सुदेश फडकुले, भारतीय जैन संघटनेचे मनोज कोचेटा, अनुप कोठारी, कासार जैन संघटनेचे राजकुमार जगधने, प्रवीण गडदे, राष्ट्रवादी युवती उपाध्यक्षा श्वेता दुरूगकर, महिला मंडळाच्या राजश्री फडकुले, अनिता पांगळ, रत्नमाला दुरूगकर, प्रिती गांधी, किर्ती अजमेरा, डॉक्टर संघटनेचे डॉ. सचिन रामढवे, वकिल संघटनेचे रोहन कोचेटा, अभिजित फडकुले, औषध संघटनेचे कुणाल गांधी व शैक्षणिक, सामजिक, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. समाजाच्यावतीने कडकडीत बंद जैन धर्मियांच्या वतीने समाजातील व्यापार्यांनी आपापली दुकाने, खासगी प्रतिष्ठाणे बंद ठेवून झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या बंदमध्ये समाजातील जैन समाजातील सर्व व्यापारी सहभागी झाले होते. दिवसभर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. उस्मानाबादच्या मुख्य बाजारपेठेत सर्व क्षेत्रातील 40 टक्के खासगी दुकाने जैन समाजाची आहेत. यामुळे बाजारपेठेवर काही अंशी परिणाम झाला.
प्रजापत्र | Wednesday, 21/12/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा