बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यातला सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या विक्रमात एका वेगळ्या विक्रमाने नोंदवला गेला. पीटर सिडलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या एडिलेड स्ट्रायकर संघाने ९ बाद १३९ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ १५ धावांत तंबूत परतला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही सर्वांत निंचाक धावसंख्या ठरली. २०१९मध्ये टर्कीचा संघ झेक प्रजासत्ताकविरुद्ध २१ धावांवर तंबूत परतला होता.
प्रथम फलंदाजीला आलेल्या एडिलेड स्ट्रायकर्सकडून ख्रिस लीन ( ३६) व कॉलिन डी ग्रँडहोम ( ३३) यांनी चांगली फलंदाजी केली. अॅलेक्स हेल्स, रिली रोसोवू असे तगडे खेळाडू असताना सिडनी थंडर्स हा सामना सहज जिंकतील असे वाटले होते. पण, त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाच फलंदाज भोपळ्यावर बाद झाले, तर ३ अतिरिक्त धावा त्यांना मिळाल्या. तरीही त्यांचा संपूर्ण संघ ५.५ षटकांत १५ धावांत तंबूत परतला. हेन्री थॉर्टनने २.५ षटकांत ३ धावांत ५ फलंदाज बाद केले. वेस अॅगरने ६ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर मॅथ्यू शॉर्टने एक विकेट घेतली.