समीर लव्हारे
बीड दि.१४-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात तर आले, मात्र कंत्राटदार आणि सरकारमधील वादामुळे आता औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रात अनेक पोलीस ठाण्यातील कॅमेरे बंद पडले आहेत. बीड जिल्ह्यातही धारुर पोलीस ठाण्यातील सर्वच्या सर्व कॅमेरे बंद आहेत तर परळी शहर पोलीस ठाण्यातीलही एक कॅमेरा सध्या बंद अवस्थेत आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये फिर्यादींना चांगली वागणूक मिळावी त्यासोबतच आरोपींच्या मानव अधिकाराचेही संरक्षण व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आणि त्याचे फुटेज जतन करुन ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये खाजगी कंत्राटदारांमार्फत असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र काही काळातच अनेक पोलीस ठाण्यांमधील कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहेत.मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड या दोन्ही परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अनेक ठाण्यांमधील कॅमेरे बंद पडू लागले असल्याचे चित्र आहे.बीड जिल्ह्यात देखील धारुर पोलीस ठाण्यातील सर्वच्या सर्व कॅमेरे मागच्या १ महिन्यांपासून बंद आहेत, तर परळी शहर पोलीस ठाण्यातील एक कॅमेरा बंद आहे.
कंत्राटदाराला मिळालेच नाहीत पैसे
राज्य शासनाने ज्या कंत्राटदारांला हे कंत्राट दिले,त्याला आणखी पहिल्या टप्प्यातील देयकच मिळाले नसल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे कंत्राटदार कॅमेरे दुरुस्तीसाठी फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
राखीव साहित्य ठेवलेच नाही
शासनाने कंत्राटदारासोबत जो करार केला, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात राखीव साहित्य ठेवणे बंधनकारक होते. मात्र असे राखीव साहित्य ठेवण्यातच आलेले नाही.
बीड जिल्ह्यातील धारुर पोलीस ठाण्यातील बंद कॅमेरा संदर्भात आम्ही कंत्राटदाराला पत्रव्यवहार केला आहे. लवकरच ते कॅमेरे दुरुस्त होतील. पोलीस ठाण्यातील कॅमेऱ्यांचा आम्ही नियमित आढावा घेत असतोच.
नंदकुमार ठाकूर, पोलीस अधिक्षक, बीड