Advertisement

जेंव्हा धाक संपतो...

प्रजापत्र | Saturday, 03/12/2022
बातमी शेअर करा

पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पदासाठी लोक पेशव्यांच्या दारात जात आहेत असे विधान ज्यावेळी शरद पवारांनी केले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील अनेकांना मिरच्या झोंबल्या होत्या. मात्र ज्यांच्याकडे राजगादीचे प्रतिनिधी म्हणून पहिले जाते, त्यांनी ज्यावेळी खासदारकीसाठी का होईना भाजपच्या दिल्लीपतींच्या पंगतीला बसण्याचे मान्य केले, खरेतर तेव्हाच या वारासदारांचा दबदबा संपला होता.  त्यामुळे आता खा. संभाजीराजे यांच्या बोलण्याची किंवा उदयनराजेंच्या अश्रूंची भाजपवाले दखल घेतील अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे निव्वळ स्वप्नरंजन आहे. मुळात सत्तेसाठीची लाचारी महाराष्ट्रात वाढीस लागली आहे म्हणूनच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी व्यक्ती आजही महाराष्ट्राच्या राजभवनात मानमरातब घेत आहे .

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेवरुन खा. संभाजीराजे संतापले आहेत. छत्रपतींचा अवमान करणारांना मानसन्मान आणि आंदोलकांना अटक असे का? असा संभाजीराजेंचा सवाल आहे. तो सवाल अर्थातच खरा देखील आहे. खा. संभाजीराजेंनाच  काय, कोणत्याही महाराष्ट्रीयन माणसाला संताप यावा अशीच ही कृती आहे. महाराष्ट्राच्या बहुजन अस्मितांचा वारंवार अपमान करणाऱ्या कोश्यारीसारख्या माणसाला आजही राजभवनात बसवून महाराष्ट्राच्या अस्मिताचेच्याच चिंधड्या उडविल्या जातात आणि महाराष्ट्रातील जनतेला हे उघड्या डोळ्याने पाहावे लागते.एरव्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपला किंवा स्वाभिमानाच्या बाता मारणाऱ्या मुख्ज्यमंत्री एकनाथ शिंदेंना याचे काहीच वाटत नाही, इतका राजकीय कोडगेपणा आता त्यांच्या  अंगवळणी पडला आहे .
मात्र महाराष्ट्रात छत्रपतींच्या गादीचे वारस असलेले खा. संभाजीराजे असतील किंवा उदयनराजे, यांचा राग आणि त्रागा याची देखील दखल भाजप घ्यायला तयार नाही. उदयनराजेंना अश्रू अनावर झाले, त्यांनी मोदींना पत्र पाठविले, खा. संभाजीराजे केंद्रावर आगपाखड करीत आहेत, मात्र यातील कोणाचीच दखल घ्यावी असे भाजपला वाटत नाही, ही मस्ती का आली याचाही विचार करण्याची ही वेळ आहे. खा. संभाजीराजे असतील किंवा उदयनराजे, त्यांना छत्रपतींच्या अवमानाचे खरोखर वाईट वाटत असेल तर ते निव्वळ त्रागा करून गप्प का आहेत? औरंगजेबाच्या दरबारात ज्यावेळी छत्रपतींना पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे केले होते, त्यावेळी दरबारी  रिवाजचा मुलाहिजा न बाळगता जो बाणेदारपणा शिवाजी महाराजांनी दाखविला होता आणि औरंगजेबाचा दरबार सोडला होता, तशी काही बाणेदार कृती आज छत्रपतींच्या वारासदारांकडून का होत नाही ? मुळात ज्यावेळी उदयननराजें सारख्यांचा भाजप प्रवेश मागच्या दराने झालेल्या प्रवेशासारखा होतो, तेव्हाच भाजपने उदयनराजेंना किती महत्व दिले आहे ते स्पष्ट झाले होते. ज्यावेळी खा. संभाजीराजेंना राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारकी बहाल करण्यात आली होती, त्यावेळी शरद पवारांनी केलेल्या 'पेशवाईच्या' उल्लेखाच्या अनेकांना मिरच्या लागल्या होत्या. मात्र आता आज छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी असल्या अनेक खासदारक्या आम्ही धुडकावून लावतो असला बाणेदारपणा दाखविला जात नसेल तर भाजपने संभाजीराजे किंवा उदयनराजेंना किती गृहीत धरले आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच राहत नाही.
या महाराष्ट्राला बाणेदारपणाची परंपरा आणि इतिहास आहे. या बाणेदारपणाची किंमत चुकवावी लागते हे खरेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्या बाणेदारपणामुळे कमी कष्ट सोसले नाहीत, मात्र त्या कष्टातूनच इतिहास घडतो, स्वराज्य उभे राहते, आज त्याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारांना मानमरातब दिला जात असेल, बहुजन चेतनांना जाणीवपूर्वक अवमानित करणाऱ्या नासक्या विकृतीला भाजपच्या सत्तेकडून खतपाणी घातले जात असेल , तर महाराष्ट्राने पेटून उठायला हवे.
महाराष्ट्राबद्दल केवळ 'दिल्लीचेही तख्त राखितो , महाराष्ट्र माझा ' असे म्हणून भागणार नाही, या महाराष्ट्रात दिल्लीच्याही तख्ताला हादरे देण्याची क्षमता आहे हे दाखवून द्यायची ही वेळ आहे. सेनापती बापटांनी 'महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले , मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा' हे लिहून ठेवलेले आहे. किमान याची तरी आठवण महाराष्ट्राने, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारासदारांनीही ठेवणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्राच्या अस्मितांचा अपमान करणारे लोक महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत, कारण आमचा दबदबा संपला आहे. तो दबदबा पुन्हा निर्माण करावा लागेल.

Advertisement

Advertisement