मुंबई: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) इंडियन प्रीमियर लीगच्या (आईपीएल) पुढच्या सीजनची तयारी करत आहे. आयपीएलच्या नव्या सीजनसाठी खेळाडूंनी आपली नावं रजिस्टर केली आहेत. बीसीसीआय पुढच्या सीजनमध्ये नवीन प्रयोग करणार आहे. भारतीय बोर्ड आयपीएल 2023 मध्ये एक नवीन नियम लागू करणार आहे. इम्पॅक्ट प्लेयर असा तो नियम असेल.
देशांतर्गत ‘या’ स्पर्धेत लागू केलेला नियम
बोर्डाने हा नियम काही दिवसांपूर्वी संपलेल्या देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी 20 टुर्नामेंटमध्ये लागू केला होता. आता आयपीएलच्या पुढच्या सीजनमध्ये हा नियम दिसेल. आयपीएलने टि्वटरवर एका फोटोच्या माध्यमातून नियम यावर्षी लागू होईल, अशी माहिती दिलीय.
काय आहे नियम?
टॅक्टिकल सब्सटिट्यूट हा काय नियम आहे? टॉसच्यावेळी कॅप्टन प्लेइंग-11 सह चार सब्सटिट्यूट खेळाडूंची नाव जाहीर करेल. या चार पैकी एका खेळाडूचा टीम सब्सटिट्यूट म्हणून वापर करेल. हा सब्सटिट्यूट खेळाडू दोन्ही इनिंगच्या 14 ओव्हरच्या आत प्लेइंग 11 मधील कुठल्याही खेळाडूला कधीही रिप्लेस करु शकतो. हा खेळाडू कोट्यातील पूर्ण ओव्हरही टाकू शकतो.
त्यावेळी हा नियम लागू नाही होणार
या नियमाच्या काही अटी आहेत. दोन्ही टीम्सना या नियमाचा फायदा उचलता येईल. काही कारणामुळे सामना 10 किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा झाला, तर हा नियम लागू होणार नाही. मॅच दरम्यान हा खेळाडू कुठलीही भूमिका निभावू शकतो.
ऋतिक शौकिन इमपॅक्ट प्लेयर
आयपीएलच्या आधी बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू केला होता. दिल्लीचा ऑलराऊंडर ऋतिक शौकिन इम्पॅक्ट प्लेयर बनला होता. ऑस्ट्रेलियाच्या टी 20 बिग बॅश लीगमध्येही हा नियम लागू करण्यात आला होता. या नियमाला एक्स फॅक्टर असं नाव दिलं होतं. या नियमातंर्गत दोन्ही टीम्स 10 ओव्हरच्या आता आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करु शकतात.