Advertisement

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

प्रजापत्र | Wednesday, 23/11/2022
बातमी शेअर करा

मुंबई-मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते 82 वर्षांचे आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याचे कळतंय.

विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाला आहे.

 

अनेक वर्षांनी दिसले छोट्या पडद्यावर

अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते. यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते या मालिकेत दिसले होते.

 

हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.

 

घरातूनच मिळाला अभिनयाचा वारसा

विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 71 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचे नाव वृषाली आहे.

Advertisement

Advertisement