फीफा वर्ल्ड कप 2022 मध्ये मंगळवारी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. लिओनेल मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाचा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तो सुद्धा तुलनेने दुबळ्या समजल्या गेलेल्या सौदी अरेबियाकडून. ग्रुप सी च्या मॅचमध्ये सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला 2-1 ने हरवलं. लिओनेल मेस्सी हा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. त्याच्या खात्यात अजून एकही वर्ल्ड कप नाहीय.
खूपच निराशाजनक सुरुवात
यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मेस्सी आणि अर्जेंटिनाची टीम मैदानात उतरली होती. पण कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनासाठी खूपच निराशाजनक सुरुवात झालीय. यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमधला हा पहिला धक्कादायक निकाल आहे.
सौदीने भेदली अर्जेटिंनाची बचाव फळी
मेस्सीने 10 व्या मिनिटालाच गोल करुन अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबियाने शानदार खेळ दाखवला. अर्जेंटिनाची बचाव फळी भेदून सौदी अरेबियाने दोन गोल केले. अर्जेंटिनाने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना सौदी अरेबियाचा बचाव भेदून गोल झळकावता आला नाही.मागच्या 36 मॅचपासून अर्जेटिंनाची टीम अपराजित होती. तो विजयी क्रम सौदी अरेबियाने बिघडवला. अर्जेंटिनाची टीम 2019 नंतर पहिल्यांदा पराभूत झाली.