Advertisement

विरोधकांच्या सापळ्यात राहुल ?

प्रजापत्र | Friday, 18/11/2022
बातमी शेअर करा

राहुल गांधींच्या 'भारत जोडो ' यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू घसरलेली आहेच. म्हणूनच अगदी सुरुवातीपासूनच भाजप या यात्रेला बदनाम कसे करता येईल याच प्रयत्नात आहे. आता सावरकरांच्या विषयातून या यात्रेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सरकार करू पाहत आहे. सावरकरांच्या बद्दल राहुल गांधी जे बोलले ते ऐतिहासिक सत्य असेलही, तरीही  सत्तेपुढे शहाणपण चालत नसते, त्या न्यायायाने याच विधानांचे भांडवल करून भाजप राहुल गांधींच्या यात्रेला मोडता घालू पाहत आहे. राहुल गांधी त्यात अडकतात का सहिसलामत  बाहेर पडतात, यावर खूप काही अवलंबून असेल.

राहुल गांधींनी ज्यावेळी 'भारत जोडो' यात्रेची घोषणा केली होती, तेव्हा भाजपचं काय , काँग्रेसच्या नेत्यांनाही राहुल गांधी खरेच इतके चालतील का असे वाटले होतेच. मात्र ज्यावेळी राहुल गांधींनी या यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात केली, आणि ते थेट लोकांच्या प्रश्नांना भिडत , लोकांना भेटत रोज चालू लागले , त्यावेळी खऱ्याअर्थाने भाजपला या यात्रेची गांभीर्याने  दखल घेणे आवश्यक वाटले होते  . भाजपने सुरुवातीलाच राहुल गांधींच्या वेषभूषेवरून, वाहनांवरून या यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधींचे लोकांमध्ये मिसळणे, रोज त्यांच्या प्रश्नांवर बोलणे याचा प्रभाव भाजपच्या कोणत्याही बनावापेक्षा अधिक प्रभावी राहिलेला आहे.
इतर कोणत्या राज्यात या यात्रेला अडचणीत आणणे भाजपला सोपे नव्हते, मात्र महाराष्ट्रात ही  यात्रा आल्यापासून लोकांचे लक्ष यात्रेपासून कसे भरकटविता येईल हेच भाजप पाहत आली आहे. त्यासाठी मग यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून कोणते तरी वेगळेच मुद्दे समोर कसे येत राहतील यावर सत्ताधाऱ्यांचा भर होता. तरीही माध्यमांमध्ये जरी राहुल गांधींच्या यात्रेला जागा मिळाली नाही, तरी प्रत्यक्षात जनतेत मात्र या यात्रेला मिळणार पाठिंबा मोठा आहे. रोज किमान लाखभर लोक राहुल गांधींच्या सोबतीने चालत आहेत. महाराष्ट्रातूनच , विशेषतः नांदेडमधून राहुल गांधींनी ' डरो मत ' चा दिलेला संदेश आणि मोदींच्या धोरणांना थेट दिलेले आव्हान भाजपसाठी अडचणीचे ठरणारे आहे. म्हणूनच भाजपला राहुल गांधी आणि या यात्रेला कोणत्यातरी विषयावर भरकटवायचे होतेच. यात भाजपच्या मदतीला सावरकर धावून आले आहेत.
राहुल गांधी यांची एकंदर वृत्ती पाहता, ते आपल्या विधानांवर ठाम राहत असतात. मध्यंतरी संघ परिवाराच्या संदर्भाने केलेल्या विधानावर देखील ते ठाम राहिले आहेत. आता ' सावरकरांनी इंग्रजांना सहाय्य केले ' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सावरकर प्रेमींना पचायला कितीही जड असले तरी  राहुल गांधींनी केलेले विधान हे ऐतिहासिक सत्य असेलही, , म्हणूनच राहुल गांधी अजूनही ठाम आहेत. या विधानातील ऐतिहासिक सत्यता भाजपला माहित नाही असेही नाही, मात्र याच  विषयावरून त्यांना आता काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट ) यांच्यात दरी निर्माण करायची आहे. महाराष्ट्रात सावरकर ही काहींची 'व्होट बँक ' आहे. महाराष्ट्रातील काही समाजघटकांनी सावरकरांना स्वतःची अस्मिता बनवलेले आहे. आणि त्याला पुन्हा धार्मिक अस्मितेशी जोडलेले आहे. म्हणूनच ही 'व्होट बँक ' दुखावली जावी अशी ठाकरेंची इच्छा नाही. यापूर्वी देखील महाविकास आघाडीच्या सत्तेची घडी बसविणे सुरु असतानाच 'सावरकर' प्रकरण पेटविण्याची प्रयत्न झाले होते, मात्र आता स्वतः राहुल गांधींनीच या प्रकरणाला हवा दिली आहे. राजकारणात अनेकदा यावेळी सांगितलेले 'ऐतिहासिक सत्य ' देखील अडचणीचे ठरत असते. राहुल गांधी जो लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकण्याचा, त्यांच्यापर्यंत बंधुभाव पोहचविण्याचा विचार घेऊन निघाले आहेत, तो विचार भाजपसाठी अडचणीचा आहे, त्यामुळेच ते आता 'नॉन इशू 'वर राहुल गांधींना घेरण्याचा, किमान त्यांच्या मार्गात मोडता घालण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्टच आहे. राहुल गांधींनीच त्यांच्या सापळ्यात अडकण्याऐवजी असल्या 'नॉन इशू ' ला महत्व न देता, किंवा प्रसंगी बगल देऊन त्यांचा माणूस जोडण्याच्या अजेंडाच पुढे रेटण्याची  आवश्यकता आहे.

 

Advertisement

Advertisement