टी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप २०२२ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नियमांमध्ये बदल केले आहेत. आता सेमीफायनल आणि फायनल सामन्यात पाऊस पडला किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आला तर डलवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल तेव्हाच होईल जेव्हा दोन्ही संघांनी प्रत्येकी १० षटकांचा सामना खेळलेला असेल. त्याविना डकवर्थ लुईस नियमाची अंमलबजावणी केली जाणार नाही. सध्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रत्येकी ५-५ षटकांचा सामना झालेला असणं गरजेचं आहे. सेमीफायनल आणि फायनल सामन्यांसाठी हिच पाच षटकांची मर्यादा वाढवून आता १० षटकांची करण्यात आली आहे.
सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला आणि खेळ पुढे होऊच शकला नाही. तर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामन्याचा निकाल तेव्हाच दिला जात होता जेव्हा दोन्ही संघांनी प्रत्येकी किमान ५ षटकं तरी खेळली असतील. त्यातील कामगिरीच्या आधारावरच सामन्याचा निकाल जाहीर केला जात आहे. पण सेमीफायनल आणि फायनलसाठी षटकांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी १० षटकं खेळली असतील आणि पावसामुळे सामना थांबला व पूर्ण होऊ शकला नाही. तर डकवर्थ लुईस नियमानुसार विजेता संघ जाहीर केला जाईल.
प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये यंदा सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. पावसामुळे सेमीफायनल किंवा फायनलचा सामना निर्धारित वेळेत किमान १०-१० षटकांचाही सामना होऊ शकला नाही. तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. याशिवाय सेमीफायनलमध्ये जर पावसामुळे राखीव दिवशी देखील सामना होऊ शकला नाही. तर ग्रूप स्टेजमध्ये टॉप राहिलेला संघ विजेता म्हणून घोषित केला जाईल आणि त्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळेल.
फायनल सामन्यातही पाऊस पडला तर काय?
वर्ल्डकपच्या फायनलमध्येही पावसाचा व्यत्यत आला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून जाहीर केलं जाईल. २००२ सालच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका संघाला संयुक्त विजेता म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये पहिला सेमीफायनल सामना सिडनीत ९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना एडलेड ओव्हलमध्ये १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर फायनल १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
यंदा पावसामुळे अनेक संघांना बसला फटका
सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्येही पावसामुळे अनेक संघांचं समीकरण बदललं आहे. आतापर्यंत एकूण चार सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. २८ ऑक्टोबरला आयर्लंड-अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्याआदी द.आफ्रिका-झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड-अफगाणिस्तान हे सामने देखील पावसामुळे अनिर्णित राहिले. डकवर्थ लुईस नियमाच्या अंतर्गत एका सामन्यात आयर्लंडनं इंग्लंडवर मात केली. याच सामन्यात जर पाऊस पडला नसता तर इंग्लंडचा संघ हमखास सामना जिंकला असता.