बँक व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशभरातील तीन लाख कर्मचारी या एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वाखाली या संपाची हाक देण्यात आली आहे.
आतातपर्यंत बँक व्यवस्थापनाकडून कर्मचारी संघटनांसोबत द्विपक्षीय चर्चा करून निर्णय घेतले जात होते. मात्र, चर्चेच्या या पद्धतीला छेद देत व्यवस्थापनाकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. द्विपक्ष करारातील तरतूदीना धाब्यावर बसवून मनमानीपणे बँक व्यवस्थापन निर्णय घेत आहेत. त्या व्यवस्थापनाच्या धोरणांच्या विरोधात संप पुकारण्यात आला असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी दिली.