उस्मानाबाद, दि. 20- शेतजमिनीच्या मोजणीसाठी शासकीय शुल्क भरल्यानंतर कसल्याही रकमेची आवश्यकता नसताना शेतकर्यास भूलथापा मारून 40 हजारांची लाच घेणार्या कळंब येथील भूमापकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अर्जदाराच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन मोजणी करून हद्दी खुणा कायम करण्यासाठी तब्बल 50 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 40 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदारदाराच्या वडिलाच्या नावे असलेली शेतजमीन करावयाची होती. त्यांनी रितसर मोजणी कार्यालयात अर्जही दिला होता. मात्र भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक प्रशांत खरात याने तक्रारदारास शेतजमीन मोजणी करून हद्दी खुणा कायम करून देण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मानसिकता तक्रारदाराची नव्हती. तरीही नाईलाज म्हणून त्याने ही रक्कम अधिक होते, असे सांगितले असता, तडजोडीअंती 40 हजार देण्याचे मान्य झाले.
परंतु ही रक्कम लाचेची असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कळंब येथील भूमि अभिलेख कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडेे त्याच्या कामासाठी म्हणून 40 हजारांची मागणी करून रक्कम स्वीकारताना भूमापक प्रशांत खरात यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सापळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, चालक दत्तात्रय करडे यांनी यशस्वी प्रयत्न केले. लाचखोर भूमापक प्रशांत खरात याच्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.