“रुपया घसरत नसून डॉलरची किंमत वाढते आहे” या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विधानानंतर आधीच घसरणीला लागलेल्या रुपयाबद्दल बाजारात चिंतेचं वातावरण वाढलं होतं. त्यातच रुपयाचा उलटा प्रवास अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. बुधवारी रुपयानं नवा नीचांक नोंदवला असून थेट ८३वर घसरण झाली आहे. तब्बल ६१ पैशांनी आज रुपयाचं अवमूल्यन झालं आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर बाहेर जाणारी परकीय गंगाजळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसागणित अधिकाधिक सक्षम होणारा डॉलर या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती ओढवल्याचं सांगितलं जात आहे.
मंगळवारी रुपया आधीच्या किमतीच्या तुलनेत १० पैशांनी घसरला. ८२.४० रुपयांवर असलेला रुपया बुधवारी मात्र नव्या नीचांकाची नोंद करत ८३.०१ वर पोहोचला.
बातमी शेअर करा