केदारनाथमध्ये मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. सकाळच्या सुमारास एक खासगी हेलिकॉप्टर केदारनाथ जवळ कोसळलं. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा जण हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेत. एकूण आठ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते, असं सांगितलं जातंय. उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं.आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये 8 भाविक होते. या भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जात असताना काळानं 6 प्रवाशांना घाला घातला. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हेलिकॉप्टर दुर्घनटेचं कारण अस्पष्ट
हेलिकॉप्टर दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथकही रवाना झालंय. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली होती. हेलिकॉप्टरचा अक्षरशः चुराडा झाल्याचे थरकाप उडवणारे फोटोही समोर आले आहेत. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.
नेमका ही दुर्घटना कशामुळे घडली, याची उकल होऊ शकलेली नाही. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, तज्ज्ञांकडून आता या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास केला जाणार आहे.