'हॅरी पॉटर' या गाजलेल्या चित्रपटाच्या सिरीजमध्ये हॅग्रीडची भूमिका वठवणारे ज्येष्ठ अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचे शुक्रवारी (14 ऑक्टोबर) निधन झाले. ते 72 वर्षांचे होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
दीर्घ काळापासून आजारी होते
रॉबी यांचे निकटवर्तीय बेलिंडा राइट यांनी एका निवेदनात याची पुष्टी केली आणि सांगितले की, "रॉबी काही काळापासून आजारी होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला."
रॉबी यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
रॉबी यांच्या निकटवर्तीयाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले, "रॉबी खूप प्रतिभावान व्यक्ती होते. त्यांनी सलग 3 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार आपल्या नावी केला होता. यामुळे त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली होती. 'हॅरी पॉटर' चित्रपटात हॅग्रीडच्या भूमिकेत त्यांना कायम स्मरणात ठेवले जाईल. जगभरातील मुलांच्या आणि मोठ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही भूमिका होती."
अभिनेत्यासोबत लेखकही होते रॉबी
रॉबी कोल्ट्रेन यांना खरी ओळख 'हॅरी पॉटर'मधून मिळाली. 'हॅरी पॉटर' सिरीजच्या चित्रपटांशिवाय ते 'क्रॅकर' या डिटेक्टिव ड्रामातही दिसले होते. त्यांची विनोदी शैली चाहत्यांना खूप आवडली. चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, रॉबी एक लेखक देखील होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.