रशिया-युक्रेन युद्धाच्या 229 व्या दिवशी 'कीव' वर झालेल्या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नागरिक घाबरले आहेत. एवढेच नव्हे तर अणू हल्ल्याच्या भीतीने देशही सोडून जात आहेत. युक्रेनमध्ये थांबलेल्या लोकांनी घर सोडून बंकरमध्ये राहण्याची तयारी सुरु केली आहे. कीव मधील अलेक्झांडर कॅडेटने घराच्या मागील बाजूस भूमिगत खोली बांधली आहे. लाकडी शेडच्या खाली बांधलेल्या या खोलीत जाण्यासाठी जमिनीपासून साडेसहा फुटांपर्यंतच्या शिडीचा वापर करावा लागतो. 32 वर्षीय अलेक्झांडरने रशियन हल्ला टाळण्यासाठी जुनी विहीर ही बंकरमध्ये बदलली असून यासाठी त्याने दोन आठवडे कठोर परिश्रम घेतले आहेत.
10 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर चिंता वाढली असून अण्वस्त्र हल्ला झाला तर आम्ही या बंकरमध्ये राहू शकतो, असे ॲलेक्झांडरला वाटते. आण्विक हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन या बंकरमध्ये पाण्याच्या बाटल्या, पॅक केलेले अन्न, रेडिओ आणि पॉवर बँक देखील ठेवली आहे. अलेक्झांडरने अण्वस्त्र हल्ल्यातून वाचण्यासाठी यशस्वी उपाय केला आहे. पण, ही खोली वापरण्याची कधीच गरज पडू नये, अशी त्याची इच्छा आहे.