आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अदानी डेटा नेटवर्कला अॅक्सेस सेवांसाठी युनिफाइड परवाना मिळाला आहे. म्हणजेच आता ही कंपनी देशातील सर्व दूरसंचार सेवा पुरवण्यास सक्षम झाली आहे. देशात अलीकडेच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकृत सुत्रांनी सांगितले की, अदानी डेटा नेटवर्क्सला यूएल (एएस) प्राप्त झाला आहे. सोमवारी हा परवाना अदानी समूहाला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, अदानी समूहाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करताना सांगितले की, त्यांच्या डेटा केंद्रांसह त्यांच्या सुपर अॅप्ससाठी एअरवेव्ह वापरण्याची योजना करत आहेत. वीज वितरणापासून विमानतळ आणि बंदरांपर्यंत ते गॅसच्या किरकोळ विक्रीला समर्थन देणार आहे.