मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही पावसाने देशभरात कहर सुरूच ठेवला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील दोन दिवस (10 आणि 11 ऑक्टोबर) उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू राहणार आहे. दुसरीकडे दिल्लीत 2007 नंतर गेल्या 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाने गेल्या 15 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
दिल्लीच्या लाहोरी गेटजवळ रविवारी मध्यरात्री एक दुमजली इमारत कोसळली, पावसामुळे झालेल्या या अपघातात चार वर्षांच्या मुलीसह 3 जणांचा मृत्यू झाला. चार जण अजूनही अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. गुरुग्राममध्ये पावसाळी तलावात बुडून 6 मुलांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांचे वय 8 ते 13 वर्षे दरम्यान आहे. मध्य प्रदेशमध्ये सोमवारी राजधानी भोपाळसह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानच्या जयपूर, अजमेर, भरतपूरसह 16 जिल्ह्यांमध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे.