Advertisement

रश्मी शुक्लांमागचे शुक्लकाष्ठ संपले?

प्रजापत्र | Friday, 07/10/2022
बातमी शेअर करा

नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपले आहे. फोन टॅपिंगप्रकरणी क्लिन चिट देण्यात आली आहे. 

 

फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर जूनमध्ये ७०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून ६ जुलैपर्यंत संरक्षण दिले होते. 

 

 

२०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापनेची हालचाल सुरू होती, त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ६० दिवस, तर एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅप करण्यात आला होता. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वेगळ्या कारणासाठी परवानगी घेऊन शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

 

 

फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालविण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर केला होता. आता राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्‍मी शुक्‍ला यांच्या विरोधात क्‍लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला तर रश्मी शुक्लांवरील केस बंद होणार आहे. 

Advertisement

Advertisement