मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) पुन्हा मोठे यश मिळाले आहे. ब्युरोने गुजरातमधील जामनगर आणि मुंबई येथील एका गोदामातून 120 कोटी रुपयांचे 60 किलो अंमली पदार्थ मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या माजी वैमानिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक एसके सिंह यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सिंह यांनी सांगितले की, हे एमडी ड्रग मुंबई आणि जामनगर येथील गोदामातून जप्त करण्यात आले आहे. खबऱ्याच्या माहितीवरून गोदामावर छापा टाकण्यात आला. एनसीबीने या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली.
एनसीबीचे डीडीजी सिंह म्हणाले की, सुरुवातीला जामनगरच्या नौदल इंटेलिजन्स युनिटने एमडी ड्रग्जच्या विक्री आणि खरेदीची माहिती दिली होती. या माहितीवरून एनसीबी आणि नेव्हल इंटेलिजन्स युनिटने संयुक्तपणे कारवाई केली. या माहितीवरून जामनगर येथून 10.350 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
आरोपी सोहेल एअर इंडियामध्ये पायलट होता
डीडीजी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक सोहेल महर गफीता 2016 ते 18 दरम्यान एअर इंडियाचा पायलट होता. जामनगर आणि मुंबईतील जप्त अमली पदार्थ प्रकरणाशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रगचे एकूण वजन 60 किलो असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 120 कोटी रुपये आहे.
ते म्हणाले की, एनसीबी मुख्यालय दिल्ली आणि मुंबई झोनल ऑफिसने 3 ऑक्टोबर रोजी जामनगरमध्ये छापा टाकला होता. मुंबईतून जामनगर येथून प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील एसबी रोड फोर्ट परिसरातील गोदामातून 50 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे.
ऑगस्टमध्ये पालघरमध्ये 1400 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते
याआधी ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातून 1,400 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या ड्रग्सचे वजन 700 किलोपेक्षा जास्त होते. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही कारवाई केली होती.