नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाला. त्यामुळे दुर्गा विसर्जन आणि रावण दहन कार्यक्रमात अडथळा आला. चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वारे वाहत आहेत, त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
नोरू चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मान्सून अजूनही सुरू असून त्याच्या परतीला विलंब होत आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाचे केंद्र बनलं आहे. पावसामुळे रब्बी पेरणीच्या सुरुवातीच्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, तर भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पुढील एक आठवडा दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीमसह देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून १३ ऑक्टोबरपर्यंत परतेल.
उत्तर प्रदेश, उत्तराखंडसाठी अलर्ट
हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस पडेल. विभागाने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ७-८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२० राज्यांसाठी यलो अलर्ट
हवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या राज्यात मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ही राज्ये आहेत – उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.