Advertisement

दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट

प्रजापत्र | Tuesday, 04/10/2022
बातमी शेअर करा

महाराष्ट्रासह देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळी सणही अगदी तोंडावर आला आहे. करोना संसर्गानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी होणार आहे. पण करोना काळात नोकऱ्या गेल्याने अद्याप अनेकांना आर्थिक अडचणींतून सावरता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्यात येणार आहेत.

 

 

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पॅकेजबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्यातील रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्यात येणार आहेत.

 

 

दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल यांचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.

Advertisement

Advertisement