सिनेक्षेत्रात मानाचा समजल्या जाणारा '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा'चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'गोदाकाठ आणि अवांछित' या सिनेमासाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर 'जून' सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार'सोहळ्यादरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले,"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1954 साली करण्यात आली आहे. सिनेमा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा असतो. भारतीय सिनेसृष्टीत वेगवेगळ्या दर्जाचे सिनेमे बनवले जात आहेत. भारतीय मनोरंजनसृष्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत सामाजिक गोष्टींकडेदेखील लक्ष ठेवते".
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले,"भारतीय सिनेमाने आज सिनेमागृहांची मर्यादा ओलांडली आहे. ओटीटीवर सिनेमा पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीत योगदान दिलेल्यांना दिला जातो. आताही भारतीय मनोरंजनसृष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्या आशा पारेख यांना हा पुरस्कार दिला जात आहे. कलेच्या माध्यमातून जागरुकता पसरवण्याचं काम सिनेमा करतो आहे. पडद्यामागे दिसणाऱ्या अनेकांनी एका सिनेमासाठी योगदान दिलेलं असतं. त्यामुळे सिनेमाला मिळालेलं यश हे प्रत्येकाचं आहे. 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे अभिनंदन".