उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दि.२३ सप्टेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद येथे चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास सरकारने परवानगी देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली व त्यास यश देखील मिळाले. तर जिल्ह्याचे सुपुत्र भाई उद्धवराव पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी नेते म्हणून अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे.
तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून देखील महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात देखील त्यांनी आपली छाप पाडली होती. त्यांनी आपली संपूर्ण हयात कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व वंचित घटकांच्या कल्याणासाठी वेचली आहे. परंतू दुर्दैवाने अद्याप या थोर सुपुत्राचे जिल्ह्यात एखादे स्मारक देखील उभे राहू शकले नाही. २०२० हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असताना देखील शासन व विधिमंडळाला त्यांचा विसर पडला याची खंत आम्हा जिल्हावासियांना आहे.
त्यामुळे किमान नव्याने सुरु होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तरी भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा आपल्याकडून गौरव व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची असल्याचे नमूद केले आहे. यावर जिल्हाध्यक्ष शरद पडवळ, जिल्हा सचिव गौस मुलांनी आदीसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.