पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Live) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती दिली. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.'मन की बात' च्या पुढच्या भागात तुम्ही बाजरीवर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे.आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ वाढण्यात यावेत, असंही ते म्हणाले.