आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअॅपचा वापर करुन पोलीस कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक (Fraud Case) होत असल्याचे समोर आल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर करून फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा फोटो वापर करत वरळीतील एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत वरळी कोळीवाड्यातील रहिवासी दिपेश जांभळे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. दिपेश जांभळे हे कुस्तीपटू आहेत. त्यांना 23 ऑगस्ट रोजी एक व्हॉट्स अॅपवर मेसेज आला. व्हॉट्स अॅपवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने प्रोफाइल फोटो म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवला होता. या आरोपीने तक्रारदार कुस्तीपटू दिपेश जांभळे यांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. आपल्याला एका मित्राला तातडीने 25 हजार रुपये ट्रान्सफर करायचे असून नेटबँकिंग काम करत नसल्याचे म्हटले. त्यामुळे तातडीने 25 हजार रुपये पाठवण्याची विनंती हॅकर्स आदित्य ठाकरे असल्याचे भासवून केली. दिपेश यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांमध्ये याची तक्रार देण्यात आली. दादर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 511 आणि 419 नुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.