Advertisement

शाळकरी मुलीचा गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल

प्रजापत्र | Sunday, 28/08/2022
बातमी शेअर करा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे एक शाळकरी मुलगी गणवेशात गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत पडताळणी केली असता हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांच्या टीम ने काढला असल्याचं समोर आलं आहे. अशा गोरख धंद्याना देहूरोड पोलिसांनी उघडपणे परवानगी दिली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी हा व्हिडीओ बाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. यात तथ्य आढळल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी मीडिया शी बोलताना दिला आहे 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे राजरोसपणे अवैद्यधंदे, गावठी दारूचे अड्डे सुरूच आहेत. देहूरोडच्या माकड चौक, शिवाजी चौक, एमबी कॅम्प या ठिकाणी देहूरोडच्या महिला पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रामेशन यांनी केला आहे. श्रीजित रामेशन यांनी तीन ठिकाणच्या गावठी दारू अड्ड्यांवर काही व्यक्ती पाठवून व्हिडिओ काढण्यास सांगितले होते. त्यात धक्कादायक बाब म्हणजे एक शाळकरी मुलगी चक्क दारू विकताना दिसत आहे.

यामुळं पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा अवैध धंद्याविषयी धाक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. दारू अड्ड्यावर अशा प्रकारे एक शाळकरी मुलगी दारू विकते हे अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्ती हे गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यसन करणारे असू शकतात आणि काही ही घडू शकते असा प्रश्न श्रीजित रामेशन यांनी उपस्थित केला आहे.
कोथुर्णी येथे सात वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. अशा घटनेची त्यांनी आठवण करून दिली. त्यामुळं पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ यावर ऍक्शन घेणे गरजेचे असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Advertisement

Advertisement