मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. 10 ऑगस्ट रोजी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 15 दिवस राजू श्रीवास्तव हे व्हेंटिलेटरवर (Ventilator) होते. त्यांच्या उपचारादरम्यान (Treatment) अनेक अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. आता 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव हे शुध्दीवर आल्याचे कळते आहे. यामुळे राजू यांच्या कुटुंबियांमध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे.
जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका
गेल्या आठवडाभर राजू यांच्या स्वास्थ्यासाठी विविध पूजा त्यांच्या चाहत्यांकडून केल्या जात होत्या. अनेक मोठे पंडित विधीवत पूजा करत होते. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना तात्काळ दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.राजू श्रीवास्तव यांना गुरुवारी 15 व्या दिवशी शुद्धी आलीयं.
तब्बल 15 दिवसांनी आले शुध्दीवर
राजू श्रीवास्तव यांना अजूनही व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले नाहीयं. दोन ते तीन दिवसांनी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पडल्यामुळे राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूतील एक रक्तवाहिनी ब्लॉक झालीयं. त्यासाठी न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेतली जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर देशातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. नितीश नायक यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत.