Advertisement

विस्थापितांचा आवाज शांत

प्रजापत्र | Monday, 15/08/2022
बातमी शेअर करा

ज्या महाराष्ट्राचे राजकारण कायम मूठभर राजकीय घराण्यांभोवती फिरत राहिलेले आहे, त्या महाराष्ट्रात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील एक व्यक्ती प्रदीर्घकाळ विधिमंडळात वावरते आणि दोन दशकाहून अधिक काळ त्या व्यक्तीच्या भोवती राजकारण फिरते हे तसे आश्चर्यच म्हटले पाहिजे. ते आश्चर्य म्हणजे विनायक मेटे. इतकी वर्षे राजकारणात राहूनही विनायक मेटे कधी प्रस्थापित झाले नाहीत आणि त्यांचे राजकारण देखील कायम विस्थापितांना सोबत घेऊनच चालले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रातील विस्थापितांचा आवाज शांत झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असली आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत योगदान दिलेले असले तरी महाराष्ट्रातील राजकारण तसे सरंजामीच राहिलेले आहे. मूठभर राजकीय घराण्यांच्याभोवतीच महाराष्ट्रातील सत्ता कायम फिरत राहिली. त्याच लोकांनी स्वतःचे पक्ष काढले किंवा वेगवेगळ्या पक्षात जाऊन सत्ता अबाधित ठेवली. अशा राजकीय परिस्थितीत मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सक्रिय होत १९९५ पासून ते आजपर्यंत स्वतःभोवती राजकारण फिरविण्यात विनायक मेटे यशस्वी झाले. एका सामान्य शेतमजूर कुटुंबातला तरुण मराठा महासंघाच्या चळवळीत सक्रिय होतो, उदरनिर्वाहासाठी मुंबईला जातो आणि पुढे महाराष्ट्राचा नेता होतो हे एक आश्चर्यच. विनायक मेटेंचा हा सारा प्रवास महाराष्ट्रातील राजकीय आश्चर्यांपैकी एक आहे.

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या विनायक मेटेंनी राजकारण आणि समाजकारण एकाचवेळी केले. किंबहुना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका परस्पराला पूरक आणि पोषक राहिल्या. ज्या-ज्या वेळी विनायक मेटेंना राजकीयदृष्ट्या शक्ती आवश्यक होती, त्या-त्या वेळी त्यांच्या समाजकारणातून त्यांना ती मिळाली. अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात 'विनायक मेटेंची सद्दी आता संपली' असे चर्चिले जायचे, मात्र त्या प्रत्येकवेळी त्यांची सामाजिक आंदोलनातली शक्ती त्यांच्या मदतीला यायची आणि विनायक मेटेंना अव्हेरणे शक्य नाही याची जाणीव ते ज्या पक्षाच्या सोबत असतील त्या राजकीय पक्षाला व्हायची. विनायक मेटे बीडचे भूमिपुत्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ती देखील बीडचेच भूमिपुत्र असलेल्या गोपीनाथ मुंडेंनी. युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात मराठा महासंघाला प्रतिनिधित्व द्यायचे म्हणून किसनराव वरखिंडे यांच्याऐवजी विनायक मेटेंना विधान परिषदेवर संधी मिळाली आणि मग नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. नंतरच्या काळात गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांचे मतभेद झाले, त्यांनी पवारांशी जवळीक साधली, पुन्हा गोपीनाथ मुंडेंना कुमक करण्यासाठी आले आणि आता देवेंद्र फडणवीसांचे ते विश्वासू होते. मराठा समाज हा विनायक मेटे यांच्या समाजकारण, राजकारणाचा केंद्रबिंदू होता. मराठा महासंघातून झालेली जडणघडण म्हणा किंवा ओळख म्हणा, पण त्यांनी पुढचे सारे राजकारण मराठा समाजाच्या प्रश्नांवर, अस्मितांवर केले. अनेक विषय लावून धरले, मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली, प्रसंगी उपद्रव क्षमता दाखवून दिली, मात्र हे सारे करताना राजकारणात विस्थापितांना संधी देण्याचे काम त्यांनी जाणीवपूर्वक केले.

विनायक मेटे प्रदीर्घकाळ संसदीय राजकारणात राहिले. विधानपरिषदेसारख्या सभागृहात दोन दशकांहून अधिक काळ राहण्याची संधी त्यांना मिळाली, मात्र ते कधीही प्रस्थापित झाले नाहीत . त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा स्वतःचा पक्ष काढला. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र नवविकास पार्टी राष्ट्रवादीत विलीन केली, त्यानंतर शिवसंग्राम ही सामाजिक संघटना आणि त्या संघटनेची राजकीय शाखा म्हणून भारतीय संग्राम पक्ष काढला, त्या पक्षाच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारणाला धक्का देणारा दबावगट निर्माण केला. विनायक मेटे नावाचा राजकीय पर्याय उपलब्ध असल्याने अनेक प्रस्थापित राजकीय पक्षांमधील विस्थापित नेत्यांना या पक्षात आवाज शिल्लक होता. विनायक मेटेंचा पक्ष फोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला किंवा अनेकदा त्यांचे बिनीचे शिलेदार इतर पक्षांमध्ये गेले. मेटेंनी सैन्य आणि सेनापती तयार करायचे आणि इतरांनी ते पळवायचे असे अनेकदा घडले, मात्र मेटे पुन्हा पहिल्यापासून कामाला लागायचे. त्यांच्या राजकारणात त्यांनी अनेक विस्थापित चेहऱ्यांना पुढे आणले, त्यांच्या समाजकारणात मराठा समाजातील विस्थापित म्हणता येईल अशा वर्गाचे ते प्रतिनिधी राहिले. त्यांच्या प्रश्नांवर ते झगडत राहिले. आताही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरील बैठकीसाठीच ते मुंबईला जात होते आणि त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. मेटे यांचे असे अचानक जाणे, महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण करणारे आहेच, त्यांच्या असण्याने राजकारणात एक प्रकारचे संतुलन तयार व्हायचे ते संतुलन आता बदलणार आहे. विस्थापितांचा आवाज आज शांत झाला आहे. अशा या प्रस्थापित राजकारण्यांना कायम दखल घ्यावी लागलेल्या मात्र कधीच प्रस्थापित न झालेल्या विस्थापितांच्या आवाजाला भावपूर्ण श्रद्धांजली .

Advertisement

Advertisement