Advertisement

संपादकीय:  'मला काय त्याचे?' मानसिकता घातक

प्रजापत्र | Wednesday, 02/07/2025
बातमी शेअर करा

बीडच्या 'उमाकिरण' शैक्षणिक संकुलाच्या संदर्भाने जो प्रकार समोर आला, त्यातून कोचिंग क्लासेस नावाच्या इंडस्ट्रीबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या प्रकरणात कोणीतरी एक पीडित विद्यार्थिनी समोर येते आणि त्यातून गुन्हा दाखल होतो, मात्र एकूणच कोचिंग क्लासेस, त्यातील विद्यार्थिनींची सुरक्षा आणि सामाजिक संकेत धाब्यावर बसवून 'काहीही करू' मानसिकतेतल्या विकृती याबद्दल गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. 'उमाकिरण' प्रकरणाचा काय तो पोलीस तपास होईल, त्यात आता एसआयटी नेमण्यात येणार आहे, त्यातून काही समोर येईल किंवा नाही हे आज सांगता येणार नाही, न्यायव्यवस्था आपले काम करील, पण एकूणच या आणि अशा प्रकरणांमध्ये समाजाची जी चुप्पी आहे, ती मात्र दीर्घकाळासाठी घातक आहे. असे प्रकार किंवा एकूणच समाजव्यवस्थेवर परिणाम करणारे प्रकार जेव्हा समोर येतात, त्यावेळी समाजातील स्वतःला बुद्धिजीवी म्हणविणाऱ्या, आपण समाजाचे काही देणे लागतो असे समजणाऱ्या सर्वच घटकांनी बोलते झाले पाहिजे. आपला काय संबंध त्या घटनेशी, मला काय त्याचे ही जी मानसिकता आहे, ती दीर्घकालीन सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे.बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे एक प्रकरण समोर आले आणि राज्यभरात खळबळ माजली. मात्र काही अपवाद वगळता ही खळबळ माध्यमांचे रकाने आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या बातम्या इतक्यापुरतीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

 

हेही वाचा..... केंद्राच्या नियमांनंतरही खाजगी क्लासेस
अनियंत्रित, अनिर्बंध आणि मोकाटच  https://prajapatra.com/12567

 

अशा घटनांवर एकूणच समाजातील बुद्धिजीवी म्हणून ओळखले जाणारे किंवा समाज ज्यांच्याकडे दिशादर्शक  म्हणून पाहतो अशा वर्गातील   लोकांच्या काहीच प्रतिक्रिया आल्या नाहीत. घडलेली घटना वाईट आहे, निषेधार्ह आहे, यात राजकारण आहे असे काही ना काही मत या वर्गाकडून व्यक्त होणे अपेक्षित होते, मात्र समाजमाध्यमांमधील मोजक्या प्रतिक्रिया सोडल्या तर या पूर्ण विषयात एकूणच सामाजिक अलिप्तता पाहायला मिळावी. काहींच्या व्यक्त होण्यामागे पुन्हा पीडिता आणि आरोपी यांच्या जाती कोणत्या याची किनार होतीच. मुळातच ज्यावेळी समाजासाठी घातक असे काही जेव्हा घडत असते, त्यावेळी त्याकडे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पाहण्याची महाराष्ट्राची परंपरा होती, मागच्या काही वर्षात त्याला सुरुंग लागला आहेच. आता गंभीर प्रकरणांवर देखील व्यक्तच व्हायचे नाही हा जो प्रकार समाजातील बहुसंख्याकांकडून होत आहे तो अधिक गंभीर आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही समाजव्यवस्थेत दुष्ट शक्ती फारशा नसतात, तुलनेने अत्यल्प म्हणाव्या इतक्या अशाच असतात, पण स्वतःला सज्जन म्हणविणारे, पापभिरू असणारे लोक मौन  पाळून असतात म्हणून दुष्ट शक्तीचे फावत असते. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणातील शिक्षक, प्राध्यापक, त्यांच्या संघटना, काही अपवाद वगळता विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना यांचे मौन खूप काही विचार करायला भाग पाडणारे आहे.
 

 

हेही वाचा..... बोगस जाहिरातबाजीबद्दल केंद्राचे नियम ,पण राज्यात
लेकरू लोकांचं अन नाचतंय ..... https://prajapatra.com/12572

 

प्रश्न एकट्या 'उमाकिरण' प्रकरणाचा नाही. मात्र एकूणच सामाजिक सुरक्षा, विद्यार्थिनींचे शिक्षण, क्लासेस नावाची इंडस्ट्री, त्यातून सामान्यांचे होणारे शोषण हे सारेच विषय यात आहेत. आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो, मात्र या महाराष्ट्रात खाजगी कोचिंग क्लासेसचे नियमन करणारा कायदा अद्यापही नसावा याची कोणालाच, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील साधी खंत देखील वाटत नाही? २००० मध्ये एक अध्यादेश काढण्यात आला, तो नंतर निरस्त झाला, २०१८ साली एक कायदा आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र अद्यापही तो कायदा होऊ शकला नाही. २०२४ साली केंद्राने काही मार्गदर्शक नियमावली तयार केली, मात्र त्याचा देखील कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. 

 

हेही वाचा.....दिखाऊ माल फसावू धंदा  https://prajapatra.com/12578

 

या पावसाळी अधिवेशनात त्याचे विधेयक येणार असल्याचे सांगितले जाते, मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यात कोचिंग क्लासेसचे नियमन करणारा कायदा नाही याबद्दल कधीच कोणीच बोलत नाही? या विषयातले सामाजिक भान कोठे आहे? मग आपण बोलणार तरी कोणत्या विषयावर? इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमधून लूट होते, आपण गप्प. शासकीय कार्यालयांमधून नियमानुसार व्हावीत ती कामे होत नाहीत, आपण गप्प. जिल्हापरिषदांच्या शाळा मोडीत निघाल्या, आपण गप्पच. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे पार तीनतेरा होतायत, आपण बोलत नाही? ही यादी फार मोठी होईल. 

 

हेही वाचा..... महाविद्यालये ओस पडली कशी?  https://prajapatra.com/12584

मग समाज म्हणून आपली जबाबदारी काय? हा विषय माझा नाही, या प्रकरणाशी आपला काय संबंध असेच प्रत्येक विषयात होत गेले तर सामाजिक समतोल साधणार कसा? समाजाच्या प्रश्नावर समाजातील धुरिणांनी व्यक्त व्हायला हवे, कोणती का होईना भूमिका घ्यायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. क्लासेसच्या इंडस्ट्रीबद्दल 'प्रजापत्र'ने संपादकीय मधून पाच भागातील लेखमाला चालविली, आम्ही अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, त्याचा उहापोह व्हायला हवा, त्यावर चर्चा व्हावी, ज्याला भावना आहेत, त्यांनी व्यक्त व्हावे, या एकाच विषयात नव्हे तर सामाजिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक विषयात समाजघटकांनी व्यक्त व्हायला हवे. तेच जिवंत समाजाचे लक्षण असते. मला काय त्याचे ही भूमिका फार काळ चसलणार नाही. 'बघ येऊन ठेपली, तुझ्या घराशी आग, झोपेची ना वेळ ही, भल्या माणसा जाग' असे सांगण्याची आणि समजून घेण्याची वेळ आली आहे.
 

Advertisement

Advertisement