Advertisement

खूनाचे सत्र सुरुच रहाणार इशाऱ्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणारा आरोपी जेरबंद

प्रजापत्र | Thursday, 26/05/2022
बातमी शेअर करा

 

चिट्ठी लिहून खून करणारा 'तो' मारेकरी गजाआड

 

शिरुर कासार तालुक्यात येथे ६ मे रात्री शेतात एकटेच असलेल्या वृध्दाचा खून तर आदल्या दिवशी ५ मे घरा समोर झोपलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये काही नावं होती त्यांना अटक होत नाही तोपर्यंत खूनाचे सत्र सुरू राहणार असा इशारा दिला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती तर, शिरुर कासार तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा मोठ्या शिताफीने तपास करीत बीड एलसीबीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलीक सुखदेव विघ्ने ( वय 65 वर्षे ) रा. आनंदगांव ता.शिरुर कासार असे मयताचे चे नाव असून ते ( दि. ६ ) मे रात्री शेतात जनावरांचे राखणं करण्यासाठी शेतात गेले होते. विघ्ने एकटे असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने छातीवर मारुन खून केला. तसेच या घटनेच्या आदल्या रात्री ( दि. ५ ) नारायण गणपती सोनवणे ( वय ६५ वर्ष ) रा. खांबा लिंबा ता. शिरूर कासार हे आपल्या घरासमोर झोपलेले होते. ते झोपेत असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने सोनवणे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. नशीब बलवत्तर म्हणून ते हल्ल्यातून बचावले. परंतु या दोन्ही ठिकाणी पोलीसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये काही नावं लिहून त्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत खूनाचे सत्र सुरूच रहाणार असा इशारा देण्यात आलेला होता. सलग दोन दिवस घडलेल्या घटना पाहून शिरुर कासार तालुक्यात अज्ञात मारेकऱ्याची दहशत पसरली होती. घटनेच गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने लोकांना रात्री घरातून एकटं बाहेर न पडण्याचे तसेच रस्त्यावर, ओट्यावर न झोपणे, रात्रीचं गस्त सुरू करण्याचे आवाहन केले. या घटनेच्या तपासासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली. दिवस निघून जात होते परंतु आरोपी सापडत नसल्याने जनतेतून पोलीस प्रशासनावर दबाव वाढत होता. दरम्यान गुप्त खबऱ्या मार्फत एलसीबी पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली की, आनंदगाव येथील खून सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण रा.तागडगांव शिवार (ता.शिरुर कासार ) यांने केला आहे. या दिशेने तपास सुरू केला असता तो सतत आपली जागा बदलत होता. प्रथम सरकल्या बिडकीन ता. पैठण जि. औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. तेथून ही तो पसार झाला. यानंतर तो पुजाई जिल्हा वर्धा येथे असल्याची माहिती मिळाली. तेथे बीड पोलीस पथक पोचले पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड किलोमीटर पोलीस जवानांनी पाठलाग करुन सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या. वरील गुन्ह्या बाबतीत विचारपूस केली असता त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यास शिरुर कासार पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याने गुन्हा का केला?, साथीदार कोण व कोणत्या हत्याराचा वापर केला? याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याने घटनास्थळी सोडलेल्या चिठ्ठ्या, नावं केवळ दिशाभूल करुन तपास भरकटला जावा या उद्देशाने टाकण्यात आले होते. आरोपीच्या मुसक्या आवळल्याने दहशतीत असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सदरील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड एलसीबीने केली आहे.

Advertisement

Advertisement