शिरूर का. - तालुक्यातील आनंदगाव शिवारात भुईमुगाची राखण करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा शनिवारी (दि.०७) पहाटे अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने भोसकून खून केला. दरम्यान, या शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझ्या बायकोचा खून झाला आहे. जोपर्यंत बायकोच्या खुनाचे आरोपी जेरबंद केले जाणार नाहीत तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहील. या चिठ्ठीमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून दहशत पसरली आहे. दरम्यान मृतदेहाजवळ सापडलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
कुंडलिक सुखदेव विघ्ने (वय ६५) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील आनंदगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पीक घेण्यात येते. हिरव्यागार पिकामुळे हरिण आणि रानडुक्करांचा त्रासही वाढला आहे. पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंडलिक विघ्ने हे आपल्या शेतात रात्रीच्या जागरणासाठी गेले होते. रात्रीतून कधीतरी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा खून केला. आज शनिवारी सकाळी सातच्या सुमारास कुंडलिक विघ्ने यांचा मुलगा वडील घरी कसे आले नाहीत म्हणून शेतात बघण्यासाठी गेला तर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मयत झालेल्या वडिलांच्या शेजारी त्यांना एक चिठ्ठी सापडली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतदेहाच्या शेजारी असणारी चिठ्ठीही ताब्यात घेतली. या प्रकरणामुळे परिसरात घबराट पसरली असून रात्री उघड्यावर झोपण्यास अथवा शेतात राखणीसाठी जाण्यास ग्रामस्थ धजावत नाहीत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर , गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, शिरूरचे ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी घटनास्थळी भेट दिली. रायमोह येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुंडलिक विघ्ने यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.याप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे विघ्ने कुटुंबीयांनी स्पष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
दोन पथके रवाना
दरम्यान, घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठतील धमकीच्या मजकुराने पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आहे. मारेकरी माथेफिरु असल्याचा अंदाज असून सर्व बाजू पडताळण्याचे काम सुरु आहे. आरोपींच्या शोधार्थ शिरुर ठाणे व गुन्हे शाखा यांचे प्रत्येकी एक अशी दोन पथके रवाना केली आहेत.