परळी दि.४ (वार्ताहर)-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक, विपश्यना केंद्र व अभ्यासिका उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून या कामासाठी तब्बल पाच कोटी ८१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
या निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा हतोला गावचे भूमिपुत्र राजेश्वर आबा चव्हाण, परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख व हातोला ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी दहा टक्के रक्कम तात्काळ निर्गमित करण्यात आली असून उर्वरित रक्कम कामाची प्रगती अहवालानुसार वितरीत करण्यात येणार आहे. आमचे नेते धनंजय मुंडे यांनी आम्हाला दिलेला शब्द तातडीने पूर्ण केला असून दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणाऱ्या नेतृत्वा सोबत आम्ही काम करतो याचा मला अभिमान असल्याचे अँड.राजेश्वर चव्हाण यांनी म्हटले आहे.