बीड-उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभू महादेव साखर कारखान्याची, परळीच्या वैद्यनाथ बँकेकडे असणारी तब्बल ४६ कोटींच्या तारण साखर चोरी प्रकरणात, बँकेतील आणखी ३ आरोपींना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संपत साबळे, रोहिदास घोडके, नीलेश देशपांडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
उस्मानाबाद कळंब तालुक्यात असणाऱ्या सावरगाव येथील शंभू महादेव सहकारी साखर कारखान्याची, ४६ कोटी रुपयांची १ लाख ५४ हजार १७७ क्विंटल साखर वैद्यनाथ बँकेकडे कर्जापोटी तारण म्हणून ठेवण्यात आली होती. ही सर्व साखर वैद्यनाथ बँकेच्या ताब्यामध्ये असताना, २०१७ - १८ मध्ये चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह वैद्यनाथ बँक संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा ४० जणांविरुद्ध, १२ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिलीप आपेट यांच्यासह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याप्रकरणात यापूर्वी अटक ही करण्यात आली आहे. तर काल २४ मार्च रोजी पुन्हा ३ जणांना अटक केलीय. अटकेत संपत साबळे, रोहिदास घोडके या २ वैद्यनाथ बँकेच्या कर्मचाऱ्यासह नीलेश देशपांडे या अंबाजोगाईच्या दीनदयाळ बँक शाखेच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर याअगोदर या प्रकरणात ६ आरोपींना अटक झालेली आहे. दरम्यान या तिघांचीही कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.