Advertisement

परळीच्या रस्त्यांचा कायापालट आमची जबाबदारी-धनंजय मुंडे

प्रजापत्र | Sunday, 20/03/2022
बातमी शेअर करा

परळी-शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत परळी येथील नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित केलेल्या ६३ कोटी २३ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी शहरातील उर्वरित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूर्ण केला आहे. 

 

         याआधी नगरोत्थान विकास प्रकल्प टप्पा एक अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम नगर परिषदेने पूर्ण केले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून परळी शहरातील प्रत्येक रस्ता दर्जेदार व्हावा, केवळ रस्तेच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकासात्मक कायापालट व्हावा, ही आमची जबाबदारी असल्याचे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान परळी शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या व भूमिगत गटारांच्या कामांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नगरोत्थान टप्पा दोन अंतर्गत शहरातील उर्वरित महत्वाच्या कामांसाठी ६३ कोटी २३ लाख रुपयांच्या रस्ते प्रकल्पास नगर विकास विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली, असून या बाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा कायापालट यानिमित्ताने होणार असून, ही कामे पूर्णत्वास आल्यानंतर नगरोत्थान प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यास देखील मान्यता मिळणार आहे; असे म्हणत धनंजय मुंडे यांनी परळीतील महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामास प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांसह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

Advertisement

Advertisement