परळी वै.दि.२८ (वार्ताहर)-महाशिवरात्र पर्वानिमित्त ज्योतिर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यासोबतच पूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून निगरानीत ठेवण्यात येत आहे.सुमारे पाच लाख भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे.
मंदिर परिसरासह शहरात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांग सुद्धा ठेवण्यात आली असून सुमारे ५ लाख भाविक वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी परळी शहरात हजेरी लावतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान कमिटीने दर्शनार्थींसाठी स्त्री-पुरूष व पास धारक अशा तीन स्वतंत्र रांगा ठेवल्या आहेत. मंदिराच्या पायऱ्यावर भव्य मंडप उभारण्यात आला असून नागमोडी वळण पद्धतीने दर्शनार्थी भाविकांसाठी बॅरीकेटस् उभे करून रांगा लावल्या जाणार आहेत. मंदिर परिसरात ८४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती देवस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. दरम्यान नेहमीप्रमाणेच मुख्य प्रवेशद्वारात दर्शन रांगेतील भाविकांची तपासणी करून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. कॅमेरा, मोबाईल, हॅण्डबॅग किंवा पिशवी असे कोणतेही साहित्य मंदिराच्या आत घेवून जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सर्व व्यवस्था लावण्यात आली आहे.