Advertisement

डीपीच्या तारेचा करंट लागून एकाचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 19/02/2022
बातमी शेअर करा

गेवराई - सिंगल फेज डीपीच्या उघड्या तारांपासून जीविताला धोका असल्याचे सांगूनही महावितरणचा अभियंता आणि लाईनमनने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर त्यांच्या हा निष्काळजीपणा ग्रामस्थाच्या जीवावर बेतला आणि विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे गाडली होती. याप्रकरणी तो अभियंता आणि लाईनमनवर गेवराई ठाण्यात शुक्रवारी (दि.१८) गुन्हा दाखल झाला. 

 

आसाराम आण्णसाहेब जाधवर (रा. सावरगाव, ता. गेवराई) यांच्या फिर्यादीनुसार,त्यांच्या गावातील रस्त्यालगत सिंगल फेज डीपी आहे. सदर डीपीच्या उघड्या पडलेल्या तारांमुळे मनुष्य आणि प्राण्यांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी मादळमोही येथील महावितरणचा अभियंता पंडित आणि लाईनम जयदीप सखाराम ढगे यांना सूचित केले होते. मात्र, त्यांनी ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही. ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वा. प्रातर्विधीसाठी या डीपीजवळून जाणारे दत्तात्रय अण्णासाहेब जाधवर (वय ४५) यांचा उघड्या तारांना स्पर्श झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बीड येथील विद्युत निरिक्षकांचा अभिप्राय मागितला होता. त्यांच्याकडून अभिप्राय येताच आसाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून अभियंता पंडित आणि लाईनम जयदीप ढगे या दोघांवर कलम ३०४ अन्वये गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सपोनि काळे करत आहेत.

Advertisement

Advertisement